Tuesday, October 7, 2008

एक संध्याकाळ ...

संध्याकाळी दारापुढे
सैलावलेला मेपल,
त्याच्या फांद्यांमधून रेंगाळणारं आळसावलेलं ऊन,
आणि सवयीनुसार पारावर विसावलेला मी.

नव्यानेच तिघांची ओळख झाली
'तुमचं कसं - आमचं कसं?'
नेहमीचेच नमस्कार-चमत्कार
घडीव शब्दाळ सोपस्कार

शब्द सरले तेव्हा मैत्र जडलं,
क्षणांत आभाळाचा झाला कॅन्व्हस
अन तिघांनी मिळून रेखाटलं
एक केशरी चित्र .... उद्याचं !

ते चित्र डोळ्यात साठवून
मेपल डोलू लागला वार्‍याच्या शीळ-मारव्यावर,
ऊन अलगद उतरलं क्षितिजापल्याड
अन मी वितळत गेलो रात्रीच्या आश्वासक अंधारात ...

'येतो' म्हणण्याचं भान कुणालाच उरलं नाही,
तशी गरजही उरली नाही.

1 comment: