Sunday, December 23, 2007

Experiments


This one turned out better than I expected. Wait ..... to tell the truth, I did not know what to expect while shooting. :)
Posted by Picasa

Wednesday, December 12, 2007

'ती' बातमी वाचल्यापासून गेल्या दोन दिवसांत मनात जे जे काही आलं ते शब्दांत सांगणं म्हणजे अक्षरश: गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. तसा प्रयत्न करायचा म्हणजे मला आधी वाल्मीकी किंवा गदिमांच्या प्रतिभेची उसनवारी करावी लागेल. ती बातमी म्हणजे ... 'पंडितजी गायले'.
ध्यानीमनी नसताना indiatimes च्या मुखपृष्ठावर बातमी वाचली. क्षणभर खरं वाटलं नाही. दुसर्या क्षणी सकाळची साईट उघडली. पहिलीच बातमी. पुढचे काही क्षण कदाचित श्वास घ्यायला विसरलो होतो. अगदी अधाशी किंवा जन्मोजन्मीचा उपाशी असल्यासारखी ती बातमी वाचली. शब्द वाचताना गडबड होत होती. आधी शब्द की आधी आशय ....? शब्द तरी कुठे एका जागी स्थिर होते? हेलकावतच होते ....
'व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा' पाहून तर फक्त हर्षवायूच व्हायचा बाकी होता. पण हाय ... दुर्दैव माझं. घरच्या तथाकथित highspeed wireless internet connection ला ते झेपलं नाही. जवळपास तासभर पुन्हापुन्हा प्रयत्न केले ... निदान एक झलक ... पहायला नाही तर निदान ऐकायला तरी ...... पण नाहीच. रात्रीची थंडी किंचित कमी असती तर रात्रीच ऒफिस मध्ये जाऊन त्या clips पाहिल्या - ऐकल्या असत्या. दुसर्या दिवशी सकाळी ऒफिसमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा www.esakal.com उघडला आणि त्या स्वरभास्कराचा आवाज ऐकला. इतकं काही मनात दाटून आलं .... नशीब त्या वेळी school मध्ये फारसे लोक नव्हते. एखाद्यानी येता जाता ऒफिसमध्ये डोकावून पाहिलं असतं आणि 'काय झालं' असा प्रश्न केला असता तर काय उत्तर देणार होतो मी? काय सांगितलं असतं? नव्हे ... काही सांगता आलं असतं का?

खरंतर मला शास्त्रीय संगीतातलं ओ की ठो कळत नाही. तानसेन काय कानसेनही नाहिये मी. दूरदर्शनवरच्या त्या 'बजे सरगम गूंज बनके देस राग' गाण्यामुळे 'देस' राग कधितरी ओळखता येतो ... आणि कधीतरी चुकून 'भैरवी'चा साक्षात्कार होतो. पण ऐकायचा शौक मात्र आहे. पुण्यनगरीतल्या काही वर्षांच्या वास्तव्यात हा शौक उत्तरोत्तर वाढत गेला. अर्थातच 'सवाई' हा गणपती-दसरा-दिवाळी प्रमाणेच वार्षिक सण बनून गेला होता. आणि सवाईच्या तमाम चाहत्यांप्रमाणेच पं. भीमसेन जोशी हे माझंही कधी दैवत बनलं हे कळलंच नाही. जाणकारां पासून संगीताच्या क्षेत्रात 'औरंगजेब' असणार्या माणसापर्यंत सगळेच लोक मान्य करतील की 'सवाई' मध्ये भीमसेनना ऐकणं हा एक अद्वितीय सोहळा असतो. मी पुण्यात इतरत्रही त्यांचे कार्यक्रम ऐकले आहेत पण 'सवाई' मधलं त्यांचं गाणं आगळंच! त्यात काय वेगळं असतं मला सांगता येणार नाही पण वेगळं असतं हे खरं.

(अपूर्ण)