Sunday, December 23, 2007

Experiments


This one turned out better than I expected. Wait ..... to tell the truth, I did not know what to expect while shooting. :)
Posted by Picasa

Wednesday, December 12, 2007

'ती' बातमी वाचल्यापासून गेल्या दोन दिवसांत मनात जे जे काही आलं ते शब्दांत सांगणं म्हणजे अक्षरश: गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. तसा प्रयत्न करायचा म्हणजे मला आधी वाल्मीकी किंवा गदिमांच्या प्रतिभेची उसनवारी करावी लागेल. ती बातमी म्हणजे ... 'पंडितजी गायले'.
ध्यानीमनी नसताना indiatimes च्या मुखपृष्ठावर बातमी वाचली. क्षणभर खरं वाटलं नाही. दुसर्या क्षणी सकाळची साईट उघडली. पहिलीच बातमी. पुढचे काही क्षण कदाचित श्वास घ्यायला विसरलो होतो. अगदी अधाशी किंवा जन्मोजन्मीचा उपाशी असल्यासारखी ती बातमी वाचली. शब्द वाचताना गडबड होत होती. आधी शब्द की आधी आशय ....? शब्द तरी कुठे एका जागी स्थिर होते? हेलकावतच होते ....
'व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा' पाहून तर फक्त हर्षवायूच व्हायचा बाकी होता. पण हाय ... दुर्दैव माझं. घरच्या तथाकथित highspeed wireless internet connection ला ते झेपलं नाही. जवळपास तासभर पुन्हापुन्हा प्रयत्न केले ... निदान एक झलक ... पहायला नाही तर निदान ऐकायला तरी ...... पण नाहीच. रात्रीची थंडी किंचित कमी असती तर रात्रीच ऒफिस मध्ये जाऊन त्या clips पाहिल्या - ऐकल्या असत्या. दुसर्या दिवशी सकाळी ऒफिसमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा www.esakal.com उघडला आणि त्या स्वरभास्कराचा आवाज ऐकला. इतकं काही मनात दाटून आलं .... नशीब त्या वेळी school मध्ये फारसे लोक नव्हते. एखाद्यानी येता जाता ऒफिसमध्ये डोकावून पाहिलं असतं आणि 'काय झालं' असा प्रश्न केला असता तर काय उत्तर देणार होतो मी? काय सांगितलं असतं? नव्हे ... काही सांगता आलं असतं का?

खरंतर मला शास्त्रीय संगीतातलं ओ की ठो कळत नाही. तानसेन काय कानसेनही नाहिये मी. दूरदर्शनवरच्या त्या 'बजे सरगम गूंज बनके देस राग' गाण्यामुळे 'देस' राग कधितरी ओळखता येतो ... आणि कधीतरी चुकून 'भैरवी'चा साक्षात्कार होतो. पण ऐकायचा शौक मात्र आहे. पुण्यनगरीतल्या काही वर्षांच्या वास्तव्यात हा शौक उत्तरोत्तर वाढत गेला. अर्थातच 'सवाई' हा गणपती-दसरा-दिवाळी प्रमाणेच वार्षिक सण बनून गेला होता. आणि सवाईच्या तमाम चाहत्यांप्रमाणेच पं. भीमसेन जोशी हे माझंही कधी दैवत बनलं हे कळलंच नाही. जाणकारां पासून संगीताच्या क्षेत्रात 'औरंगजेब' असणार्या माणसापर्यंत सगळेच लोक मान्य करतील की 'सवाई' मध्ये भीमसेनना ऐकणं हा एक अद्वितीय सोहळा असतो. मी पुण्यात इतरत्रही त्यांचे कार्यक्रम ऐकले आहेत पण 'सवाई' मधलं त्यांचं गाणं आगळंच! त्यात काय वेगळं असतं मला सांगता येणार नाही पण वेगळं असतं हे खरं.

(अपूर्ण)

Saturday, November 3, 2007

Halloween

I know halloween is gone ... but ... I got this shot just a day later.


IMG_0478

Saturday, October 6, 2007

जे जे उत्तम ....

इंदिरा संत हे नाव नुसतं आठवलं तरी एक अगदी शांत सोज्वळ कविवृत्ती साकार सामोरी येते. त्यांच्या कवितांबद्दल काही लिहावं ही माझी पात्रता नाही. त्यांनी अगदी मोजकंच गद्य लिखाण केलं. पण ते गद्य हे ही एक काव्यच! त्यांच्या 'मृद्गंध' या लेख संग्रहातल्या 'अरसिक किती हा शेला ..' या लेखातले २ उतारे इथे लिहित आहे. निसर्गाचं असं शब्दचित्र क्वचितच कुणी चितारू शकेल. इंदिराबाईंच्या अजोड लेखनसामर्थ्या बरोबरच हा लेख आवडण्याचं आणखी एक वैयक्तिक कारण म्हणजे या लेखातला एक वर्ण्य विषय - बेळगाव. :)
-----------------------------------------------------------------

वादळासकट गारांचा पहिला वळीव कोसळून जावा. मग त्याच्या दुसर्या दिवशी सृष्टीने जो नजराणा पुढे केलेला असतो तो बघत रहावा. दरवर्षी मी त्या दिवसाची वाट पाहात असते. त्या दिवसाचा सूर्य उगवतो तोच किती निराळा! सूर्य चांगला वर आलेला असतो. तरी तो लाल पिवळा असा, उगवत्या पूर्ण चंद्रासारखा आभाळात स्निग्धपणे तरंगत असतो. सभोवती लालसर धुक्याचे वलय असणारा आणिचांगले उजाडल्यावरही असा प्रसन्न रंगमूर्ती दिसणारा सूर्य त्याच दिवशी पाहारला मिळतो.
दूर आकाशाला टेकलेला यळ्ळूर गडही जमिनीसरशी तिरपे पंख पसरून पाठमोर्या बसलेल्या राखी पक्ष्यासारखा दिसतो, आणि त्याच्या पायथ्याशी जी झाडांची लांबलचक पसरलेली गर्दी असते. तीत शुभ्र अशा सावरीच्या कापसासारखे धुके घनदाट भरुन असते. शुक्याचा तो शुभ्र लांबलचक पट्टा आणि त्यात माने-कपाळापर्यंत बुडुन गेलेली झाडे, पलीकडे मधूनच चमकणारा विजेच्या तारांचा जुडगा ... ध्यानी मनी नसताच नकळत एक ओवी ओठांवर येते.
"भरली चंद्रभागा,
झाडं बुडाली लहान थोर
सव्वालाखाचा पीतांबर,
जनी धुईते पायावर ..."
जनी दिसत नव्हती, पण चंद्रभागा दिसत होती, बुडालेली झाडेझुडे दिसत होती. आणि त्या बहुमोल पीतांबरावरील जर चमचमत होती. मग विटेवर उभे राहून जनीची निर्व्याज भक्ती बघणारा तो विठू, म्हणजे इथे काशात कोमलाहून कोमल होऊन ते नवल पाहत राहिलेला हा सूर्य तर नसेल?
पण या मनोहारी चित्रापेक्षाही, वातावरणातील झिरिमिरी धुक्याला किती बघावे असे मला झाले. माझ्या श्वासाला जाणवणारे आणि खिडकीपासून त्या चंद्रभागेपर्यंत जे धुके लहरत होते त्याची शोभा कशी वर्णन करणार? समोरच्या इमारती, माळावरून जाणारी माणसे, शेळ्या, शेतातील कुणी चालवत असलेली कुरी, शिवारातील झोपडे ... या सर्वांवर जाळीदार मोहिनी पसरणारे ते तरळ विरळ धुके हाच या दिवसाचा सृष्टीने पुढे केलेला नाजूक नजराणा होता. हे धुके कसले? झिरझिरित अशी अती तलम ओढणीच. आणि मनात आले, सकाळी सकाळी शेजघरातून बाहेर येऊन वावरणारी नववधू जशी पापण्या खाली वळवून, नणंदा-जावाच्या रोखलेल्या गमतीदार नजरा टाळते आणि ओठावरची लाली आणि डोळ्यांतील चमक दिसू नये म्हणून घुंघट पुढे ओढून घरभर लगबगीने फिरते ... तशी ही सृष्टी, अवगुंठनवती.
महावस्त्राचा एक पदत बोटांनी धरून उचलून घडी उलगडावी तसे आता होते. समोर हे जाळीदार मनोहारी दृश्य दिसत असताना, मनात निराळेच धुके दिसू लागते. आमच्या घुमटमाळावरील रस्त्यावर मी हिवाळाभर बघत असलेले. वाहत्या नदीत शुभ्र वस्त्र पसरावे आणि ते प्रवाहावरोबर पसरत असताना त्यावर वलयांच्या चुण्या उमटत याव्यात, तसे समोरुन, आजूबाजूंनी पायाशी रांगत लहरत लाटालाटांनी येणारे धुके. शेजारच्या शेतावरुन फेनिल लहरींसारखे वार्यावर झुलत येणारे धुके. ते दुरुन येऊन एकदा पायांवरुन जाईपर्यंत पाऊलच पुढे उचलता येत नाही. वाटते, थोडे मुठीत धरुन ठेवावे. पण मिळत नाही.

(आणि लेखाच्या शेवटी .....................)

समोर ते विरळ जाळीदार धुके अजून तरंगत आहे आणि त्याच धुक्याच्या या चुण्या माझ्या मनात मी उलगडत आहे. सृष्टीचे जणू ते एक महावस्त्रच. खरेच, तिचा शेलाच तो = पण तो ती असा का उचलते आहे? कुस्करते आहे? डोळ्यांशी धरते आहे? निसर्गाच्या या भव्य मंचावर हा एक प्रवेशच चालला आहे की काय?
मला समोर दिसतो आहे अरण्याचा रंगमंच. त्यावर बाजूला जमिनीवर शेला पडला आहे. सुभद्रा तो विस्मित मुद्रेने उचलून पसरुन न्याहाळते आहे. संगीताचे सूर हार्मोनिअमवर निघतात आणि हात शेला घेतलेली ती सुभद्रा गाते आहे .....
"अरसिक किती हा शेला ...."
गाता गाता किती लाडिक विभ्रम करते आहे. तिच्या प्राणपतीला सोडून तो रानभरी झाला आहे. हा दोष तिच्या प्राणेश्वराचा नाही. शेल्याचाच आहे. कारण त्या सुंदर तनूला तो सोडून आला आहे. क्षणांत त्याला निरखून बघते, खांद्यावर पसरुन बघते, कुस्करुन डोळ्याला लावते, घट्ट हृदयाशी धरते- किती विभ्रम करी ती सुभद्रा गात आहे! की ही सृष्टीच सुभद्रा आहे? ...
आता मला हेच कळेनासे झाले आहे, की हा प्रवेश समोर चालला आहे, की माझ्या मनात चालला आहे? सौंदर्यदर्शनाने वर्तमान-भूताचा विसर पडतो आहे, म्हणतात ते काही खोटे नाही.
डोळ्यांसमोर तो परमेश्वराला शोभेल असाच बहुमोल शेला पसरला आहे आणि गाणे ऐकू येत आहे.
"अरसिक किती हा शेला ..."

संग्रह: मृद्गंध
लेख: अरसिक किती हा शेला....
लेखिका: इंदिरा संत

--------------------------------------------------------

Tag कुणाला करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. कुणी सापडलं तर करेन लवकरच.
हा फोटो Lake Ontario वर एका संध्याकाळी घेतला गेल्या महिन्यात. जेव्हा जेव्हा मी माझा जुना film SLR वापरतो, तेव्हा तेव्हा दर वेळी नव्याने त्याच्या प्रेमात पडतो. अर्थात हे प्रेम अगदीच क्षणभंगूर ठरतं. कारण एकदा वापरला की तो कपाटात जातो आणि मी त्याच्याबद्दल पूर्णपणे विसरुन जातो. आणि आता नवीन DSLR आल्यामुळे बहुदा हा त्या कॆमेर्यातला शेवटचाच रोल ठरेल.

Tuesday, September 4, 2007

मोहळ


कळत नाही कशानं ..
पण अचानक उठतं
दिशादिशांत फेर धरत
शब्दांचं मोहळ ....

किती प्रयत्न करावा?
किती धीर धरावा?
शेवटी नाहीच लागत हाती
एकही शब्द.

नसेलच मिळणार तर ना सही
मधाचा अंश,
पण एखादा प्राणांतिक दंश तरी ...?

Saturday, September 1, 2007

एक अपूर्ण कविता. कदाचित पूर्ण न होणारीच असावी. लिहिण्यासारखं बरंच काही आहे पण 'पाल्हाळ' होऊ नये अशा प्रकारे लिहिणं अवघड आहे. त्यामुळे 'मायबोली' वर न लिहिता इथे लिहीत आहे. कधी वाटलंच तर edit करता येईल.

**********************************************************

मला तसं बरंच काही सांगायचं आहे
काहीबाहीच असेल कदाचित ..
पण बर्याच गोष्टींबद्दल सांगायचं आहे ...

'एवढं कशाबद्दल सांगायचं आहे?'
कशाबद्दलही .. उदाहरणार्थ ..
आईच्या हातच्या ओरपलेल्या आमटीबद्दल
मला न जमणार्या चहाबद्दल
आजीला आवडणार्या आईस्क्रीमबद्दल,
आठवणीने तिच्यासाठी ते आणणार्या कर्मठ आजोबांबद्दल ...
साखरझोपेतल्या केशरी स्वप्नाबद्दल
ओझरत्याच भेटीत झालेल्या नजरबंदीबद्दल ...

झालंच तर ,
जागतिक बाजारातल्या मंदीबद्दल
वाढत जाणार्या सामाजिक दरीच्या रुंदीबद्दल
लबाड राजकारणी आणि लाचार जनतेबद्दल
खर्याखुर्या संत महात्म्यांच्या कल्पनेतल्या समतेबद्दल
जगभरातल्या मनुष्यप्राण्यांच्या स्वातंत्र्यादि हक्कंबद्दल
आफ़्रिकेतल्या genocide बद्दल
पर्यावरणाच्या रोज होणार्या र्हासाबद्दल
विश्वाच्या उदय-अस्ताच्या प्रमेयांबद्दल ... आणि...
त्यातल्या माझ्या जन्माच्या प्रयोजनाबद्दल ..........

'कुणाला सांगायचंय?'
कुणालाही ... हो ... अगदी कुणालाही ..
कौतुकाने ऐकणार्या आईला
वर्तमानपत्रामागे उत्सुकता लपवून निर्विकारपणे ऐकणार्या वडिलांना
पहाटेच्या टपोर प्राजक्तसड्याला
नदीकाठच्या शुचिर्भूत कातळाला
त्या कातळापुढे जुळणार्या सुरकुतलेल्या भेगाळ हातांना
विश्वविजयाची इच्छा बाळगणार्या सिकंदराच्या वंशजांना
क्रांतीची गीते गाणार्या मोकाट भाटांना

रस्त्यावरच्या ओळखीच्या वाटणार्या अनोळखी गर्दीला
याला, त्याला, तुम्हाला .....
एवढंच काय ... पण अगदी मला स्वत:लादेखील!

बरंच काही सांगायचं आहे ...
बघू योग कधी येतो ते.

Sunday, July 15, 2007

मनाचे आरस्पानी थेंव

जुनं वेबपेज बंद करुन टाकलं. त्याच्या मुखपृष्ठावरची कविता इथे हलवावी असं वाटलं म्हणून .........
***********************


भोवतीच्या जगात
आपल्याच मनाचं प्रतिबिंब
आपण शोधत राहतो
कसल्याश्या नजरेनं ...

कधी जगाचा वेध
सारं जग स्वत:मध्ये सामावून घेत,
तर कधी जगाच्या पलिकडे
स्वत:च्याच अस्तित्वाचं क्षितिज न्याहाळत .....

अशा तंद्रीच्या वेळी
मनाचं आभाळ आशयघन होऊन
भरून येऊ लागतं।
जिवाची घालमेल असह्य होते
क्षितिजावर तेव्हा शब्दांची नक्षत्रे फेर धरू लागतात
आणि हलकेच झरू लागतात
मनाचे आरस्पानी थेंब .......

Saturday, July 14, 2007

श्री गणेशाय नम:!

नमन झालं. आता पुढे काय? लिहिणार काय आणि ते वाचणार कोण? म्हणजे कुणी वाचावं म्हणून लिहावं की ते 'स्वान्त सुखाय' कि कायसंसं म्हणतात तसं लिहावं? आणि 'स्वान्त सुखाय' लिहायचं तर मग ते इथे कशाला लिहायचं? आणि कुणी वाचावं म्हणून लिहायचं तर आधी वाचणारी टाळकी जमा केली पाहिजेत आणि मगच आपलं टाळकुटं पुराण सुरु केलं पाहिजे. कुणीसं म्हणून गेलंय म्हणे ना की दिवसाकाठी एखादं पानभर तरी काहीतरी लिहावं. म्हणणारे गेले म्हणून, म्हणून काय ते सगळ्यांनाच जमणारं आहे? त्यातून माझ्यासारख्या मुलखाच्या आळशी माणसाला कसं साधावं ते? जाऊ दे झालं. मी आपला सठी सहामाशी एखादा काव्यकण (फारशी तोशीश न करता जमलंच तर) इथे पखरून जाईन. No promises though.


परागकण