Monday, November 10, 2008
Saturday, November 1, 2008
आर न पार
आयुष्य
समुद्रासारखं.
आपण मात्र नेहमीच
उभे असतो किनार्यावर
अगदी घट्ट पाय रोवून
धृवालाही खुन्नस देत.
आणि मग
भरती-ओहोटीच्या वेळा येतात
ध्यानीमनी नसताना लाटा रोख बदलतात
पायाखालची वाळू ..... वाळूच ती शेवटी ...
सरकू लागते,
तेव्हा
आधार वाटतो
फक्त ... आकाशाचा.
धरावा का असा भरवसा?
आकाशाचा?
ज्याला न आर न पार स्वतःचाच?
ज्याची निळाई रंगते आपल्याच गहिर्या वेळच्या नजरेने
आणि ज्याची अथांगता मूळ धरते
आपल्याच पायाखालच्या सरकणार्या वाळूतून ...
धरावा का मग भरवसा?
अशा आकाशाचा?
जे न आर न पार?
Monday, October 27, 2008
Tuesday, October 21, 2008
http://paragkan.imagekind.com/Paragkan
Tuesday, October 7, 2008
एक संध्याकाळ ...
संध्याकाळी दारापुढे
सैलावलेला मेपल,
त्याच्या फांद्यांमधून रेंगाळणारं आळसावलेलं ऊन,
आणि सवयीनुसार पारावर विसावलेला मी.
नव्यानेच तिघांची ओळख झाली
'तुमचं कसं - आमचं कसं?'
नेहमीचेच नमस्कार-चमत्कार
घडीव शब्दाळ सोपस्कार
शब्द सरले तेव्हा मैत्र जडलं,
क्षणांत आभाळाचा झाला कॅन्व्हस
अन तिघांनी मिळून रेखाटलं
एक केशरी चित्र .... उद्याचं !
ते चित्र डोळ्यात साठवून
मेपल डोलू लागला वार्याच्या शीळ-मारव्यावर,
ऊन अलगद उतरलं क्षितिजापल्याड
अन मी वितळत गेलो रात्रीच्या आश्वासक अंधारात ...
'येतो' म्हणण्याचं भान कुणालाच उरलं नाही,
तशी गरजही उरली नाही.
Tuesday, September 23, 2008
Framing a picture really makes a difference. I have seen some fairly ordinary pictures that looked extraordinary because of an attractive frame or border. I always wanted to add border to atleast some of my photographs but did not know how. I got my hands on photoshop CS3 last week. One can see the difference that a good border can make.
Wednesday, August 27, 2008
Saturday, June 14, 2008
Thursday, February 14, 2008
आरसा
घरातली ही खोली, माझी
मीच निवडलेली
जराशी आडबाजूची
बरीचशी अडगळीची
श्वास खोलावणार्या अंधाराची ...
डोकवायचंच असेल आत तर
ढकलावा लागेल तुम्हालाच दरवाजा स्वतःच्या जोखमीवर.
एक हलकीशीच, पण निश्चयी फुंकरही पुरेल
कडीकोंड्याविना दरवाजा अगदी सताड उघडेल.
अन आत काय दिसेल?
जुनाट चिवट भिंतींच्या आधाराने तगलेली अडगळ
आणि जमिनीवर मधोमध एक चकचकीत आरसा,
पूर्व-पश्चिम दोनच झरोके,
त्यातून सहजपणे खोलीत घुसणारे स्वप्नाळू परंतु तेजस कवडसे -
एक अंधार उजळणारा
दुसरा अंधार ठसविणारा ...
आणि आरशाची अखंड धडपड, ते कवडसे झेलण्याची
पेलण्याची, शोषून घेण्याची
आणि स्वत: कवडसा बनण्याची ....
विशेष सूचना:
कृपया दाराबाहेरच्या disclaimer वर सही करायला विसरू नका -
"मी स्वतःच्या जोखमीवर हा दरवाजा उघडत आहे.
फुंकर मारण्यापूर्वी मी पुनःपुन्हा विचार केला आहे."
Saturday, February 9, 2008
बाबा .....
ऐकलं आहे
निखळणार्या तार्याकडे मागितलेलं मागणं नक्की मिळतं.
तसा माझाही विश्वास नाही अंधश्रद्धांवर
पण कधी कधी तो आधारही अश्रूमोलाचा ठरतो
आज इतकंच मागणं त्या निखळणात्या तार्याकडे -
जे चांदणं तू आजवर प्राणांची आहुती देत फुलवलंस,
त्याच्या एका किरणाने
माझी कमावलेली आत्मलुब्धता करपून जावो
आणि त्यातून तावून सुलाखून निघो
माझी आत्मनिष्ठा !
त्याशिवाय कसा होईल प्रवास सफ़ल,
ओंडक्यापासून समिधेपर्यंतचा?