Tuesday, September 4, 2007

मोहळ


कळत नाही कशानं ..
पण अचानक उठतं
दिशादिशांत फेर धरत
शब्दांचं मोहळ ....

किती प्रयत्न करावा?
किती धीर धरावा?
शेवटी नाहीच लागत हाती
एकही शब्द.

नसेलच मिळणार तर ना सही
मधाचा अंश,
पण एखादा प्राणांतिक दंश तरी ...?

Saturday, September 1, 2007

एक अपूर्ण कविता. कदाचित पूर्ण न होणारीच असावी. लिहिण्यासारखं बरंच काही आहे पण 'पाल्हाळ' होऊ नये अशा प्रकारे लिहिणं अवघड आहे. त्यामुळे 'मायबोली' वर न लिहिता इथे लिहीत आहे. कधी वाटलंच तर edit करता येईल.

**********************************************************

मला तसं बरंच काही सांगायचं आहे
काहीबाहीच असेल कदाचित ..
पण बर्याच गोष्टींबद्दल सांगायचं आहे ...

'एवढं कशाबद्दल सांगायचं आहे?'
कशाबद्दलही .. उदाहरणार्थ ..
आईच्या हातच्या ओरपलेल्या आमटीबद्दल
मला न जमणार्या चहाबद्दल
आजीला आवडणार्या आईस्क्रीमबद्दल,
आठवणीने तिच्यासाठी ते आणणार्या कर्मठ आजोबांबद्दल ...
साखरझोपेतल्या केशरी स्वप्नाबद्दल
ओझरत्याच भेटीत झालेल्या नजरबंदीबद्दल ...

झालंच तर ,
जागतिक बाजारातल्या मंदीबद्दल
वाढत जाणार्या सामाजिक दरीच्या रुंदीबद्दल
लबाड राजकारणी आणि लाचार जनतेबद्दल
खर्याखुर्या संत महात्म्यांच्या कल्पनेतल्या समतेबद्दल
जगभरातल्या मनुष्यप्राण्यांच्या स्वातंत्र्यादि हक्कंबद्दल
आफ़्रिकेतल्या genocide बद्दल
पर्यावरणाच्या रोज होणार्या र्हासाबद्दल
विश्वाच्या उदय-अस्ताच्या प्रमेयांबद्दल ... आणि...
त्यातल्या माझ्या जन्माच्या प्रयोजनाबद्दल ..........

'कुणाला सांगायचंय?'
कुणालाही ... हो ... अगदी कुणालाही ..
कौतुकाने ऐकणार्या आईला
वर्तमानपत्रामागे उत्सुकता लपवून निर्विकारपणे ऐकणार्या वडिलांना
पहाटेच्या टपोर प्राजक्तसड्याला
नदीकाठच्या शुचिर्भूत कातळाला
त्या कातळापुढे जुळणार्या सुरकुतलेल्या भेगाळ हातांना
विश्वविजयाची इच्छा बाळगणार्या सिकंदराच्या वंशजांना
क्रांतीची गीते गाणार्या मोकाट भाटांना

रस्त्यावरच्या ओळखीच्या वाटणार्या अनोळखी गर्दीला
याला, त्याला, तुम्हाला .....
एवढंच काय ... पण अगदी मला स्वत:लादेखील!

बरंच काही सांगायचं आहे ...
बघू योग कधी येतो ते.