Thursday, February 14, 2008

आरसा

घरातली ही खोली, माझी
मीच निवडलेली
जराशी आडबाजूची
बरीचशी अडगळीची
श्वास खोलावणार्या अंधाराची ...

डोकवायचंच असेल आत तर
ढकलावा लागेल तुम्हालाच दरवाजा स्वतःच्या जोखमीवर.
एक हलकीशीच, पण निश्चयी फुंकरही पुरेल
कडीकोंड्याविना दरवाजा अगदी सताड उघडेल.

अन आत काय दिसेल?

जुनाट चिवट भिंतींच्या आधाराने तगलेली अडगळ
आणि जमिनीवर मधोमध एक चकचकीत आरसा,
पूर्व-पश्चिम दोनच झरोके,
त्यातून सहजपणे खोलीत घुसणारे स्वप्नाळू परंतु तेजस कवडसे -
एक अंधार उजळणारा
दुसरा अंधार ठसविणारा ...
आणि आरशाची अखंड धडपड, ते कवडसे झेलण्याची
पेलण्याची, शोषून घेण्याची
आणि स्वत: कवडसा बनण्याची ....

विशेष सूचना:
कृपया दाराबाहेरच्या disclaimer वर सही करायला विसरू नका -
"मी स्वतःच्या जोखमीवर हा दरवाजा उघडत आहे.
फुंकर मारण्यापूर्वी मी पुनःपुन्हा विचार केला आहे."

3 comments:

Asha Joglekar said...

सुंदर कविता. हया आरशा सारखीच असते आपली धडपड दु:ख सोसून सुछाला पकडण्याची .

Asha Joglekar said...

सुखाला, सुछाला नाही.

परागकण said...

dhanyawaad !