Sunday, July 15, 2007

मनाचे आरस्पानी थेंव

जुनं वेबपेज बंद करुन टाकलं. त्याच्या मुखपृष्ठावरची कविता इथे हलवावी असं वाटलं म्हणून .........
***********************


भोवतीच्या जगात
आपल्याच मनाचं प्रतिबिंब
आपण शोधत राहतो
कसल्याश्या नजरेनं ...

कधी जगाचा वेध
सारं जग स्वत:मध्ये सामावून घेत,
तर कधी जगाच्या पलिकडे
स्वत:च्याच अस्तित्वाचं क्षितिज न्याहाळत .....

अशा तंद्रीच्या वेळी
मनाचं आभाळ आशयघन होऊन
भरून येऊ लागतं।
जिवाची घालमेल असह्य होते
क्षितिजावर तेव्हा शब्दांची नक्षत्रे फेर धरू लागतात
आणि हलकेच झरू लागतात
मनाचे आरस्पानी थेंब .......

Saturday, July 14, 2007

श्री गणेशाय नम:!

नमन झालं. आता पुढे काय? लिहिणार काय आणि ते वाचणार कोण? म्हणजे कुणी वाचावं म्हणून लिहावं की ते 'स्वान्त सुखाय' कि कायसंसं म्हणतात तसं लिहावं? आणि 'स्वान्त सुखाय' लिहायचं तर मग ते इथे कशाला लिहायचं? आणि कुणी वाचावं म्हणून लिहायचं तर आधी वाचणारी टाळकी जमा केली पाहिजेत आणि मगच आपलं टाळकुटं पुराण सुरु केलं पाहिजे. कुणीसं म्हणून गेलंय म्हणे ना की दिवसाकाठी एखादं पानभर तरी काहीतरी लिहावं. म्हणणारे गेले म्हणून, म्हणून काय ते सगळ्यांनाच जमणारं आहे? त्यातून माझ्यासारख्या मुलखाच्या आळशी माणसाला कसं साधावं ते? जाऊ दे झालं. मी आपला सठी सहामाशी एखादा काव्यकण (फारशी तोशीश न करता जमलंच तर) इथे पखरून जाईन. No promises though.


परागकण