Monday, November 10, 2008

Saturday, November 1, 2008

आर न पार

आयुष्य
समुद्रासारखं.
आपण मात्र नेहमीच
उभे असतो किनार्‍यावर
अगदी घट्ट पाय रोवून
धृवालाही खुन्नस देत.

आणि मग
भरती-ओहोटीच्या वेळा येतात
ध्यानीमनी नसताना लाटा रोख बदलतात
पायाखालची वाळू ..... वाळूच ती शेवटी ...
सरकू लागते,
तेव्हा
आधार वाटतो
फक्त ... आकाशाचा.

धरावा का असा भरवसा?
आकाशाचा?
ज्याला न आर न पार स्वतःचाच?
ज्याची निळाई रंगते आपल्याच गहिर्‍या वेळच्या नजरेने
आणि ज्याची अथांगता मूळ धरते
आपल्याच पायाखालच्या सरकणार्‍या वाळूतून ...

धरावा का मग भरवसा?
अशा आकाशाचा?
जे न आर न पार?